शेतकऱ्यांसाठी खूशखबर, प्रतिक्षा संपली; या दिवशी जमा होणार शेतकरी सन्मान निधीचा 18 वा हप्ता

18

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या दरम्यान पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील 23,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे आणि बंजारा विरासत संग्रहालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आरे ते बीकेसी दरम्यान ठाणे आणि मुंबई मेट्रोच्या लाइन 3 मध्ये सुमारे 32,800 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही उद्या होणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता म्हणून सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20 हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 3.45 लाख कोटी देण्यात आले आहेत. पीएम मोदी मुंबईतील शेतकऱ्यांसाठी आणखी अनेक घोषणा करणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपये जारी करणार आहेत. याशिवाय, कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920 कोटी रुपयांचे 7,500 प्रकल्प देखील सुरू केले जातील. याशिवाय, 1,300 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या 9,200 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) देखील देशाला समर्पित केल्या जातील.

मोदींचा वाशिम दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11.15 वाजता वाशिमला पोहोचणार आहेत. तेथे ते जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते पुष्प अर्पण करण्यासाठी जाणार आहेत. याशिवाय 19 मेगावॅट क्षमतेच्या 5 सोलर पार्कचे उद्घाटनही ते करणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत हे सोलर पार्क तयार करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बेहन योजनेच्या लाभार्थ्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे.

काय आहे किसान सन्मान निधी योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत सरकार देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात आणि हे पैसे दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आणि यावेळी 18 व्या हप्त्यात फक्त 2000 रुपये दिले जातील.