स्मशानभूमीच्या जागेसाठी ख्रिस्ती समाज बांधवांचा कफन पेटी मोर्चा

14

ख्रिश्चन समाजाचा कफनपेटी मोर्चा
मूल, ता. ७: स्मशानभूमीच्या जागेसाठी ख्रिस्ती समाज बांधवांचा कफन पेटी मोर्चा सोमवार (ता. ७) तहसील कार्यालयावर धडकला. यात शेकडो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.
येथील संत स्टेफन चर्चपासून मोर्चाला सुरुवात झाली. रामलीला भवन , गांधी चौकामार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व रेव्ह. अॅन्थोनी परिच्छा, डॉ. मार्टीन अझीम, अॅड. अश्वीन पॉलीकर यांनी केले. मोर्चात शासन आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या कफन पेटीला जागा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागील चाळीस वर्षांपासून ख्रिस्ती समाजाला स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसल्याने हा कफन पेटी मोर्चा काढण्यात आला , असे अॅड. अश्वीन पॉलीकर यांनी सांगितले. सातत्याने पत्रव्यवहार करूनही प्रशासन समाज बांधवांची दिशाभूल करीत आहे. मोक्याची जागा असूनही आमच्या स्मशानभूमीसाठी प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न समाजबांधवांनी प्रशासनाला विचारला. येणाऱ्या दिवसांत समाजात कोणाचाही मृत्यू झाल्यास त्याला दफन करायचे कुठे ? अन्यथा आम्ही मृतदेह तहसील कार्यालयात आणून ठेवू. त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे समाज बांधवांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन तहसीलदार मृदूला मोरे यांनी स्वतः मंडपात येऊन स्वीकारले. पोलिस निरीक्षक सुमीत परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता.