अल्पभूधारक कुटुंबातील कविता हरिणखेडे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देत ती उत्तीर्ण केली. त्याआधारे त्यांची नियुक्ती वरोरा (चंद्रपूर) उपविभागीय कृषी अधिकारी पदी करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २१) त्यांनी आपला प्रभार स्वीकारला.
रडणाऱ्यांचे नाही तर लढणाऱ्यांचे हे जग आहे, असे म्हटले जाते. याच आशावादातून परिस्थितीशी दोन हात करीत एका अल्पभूधारक शेतकरी कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गड सर करीत उपविभागीय कृषी अधिकारी पदापर्यंत मजल गाठली आहे. कविता दिगंबर हरिणखेडे असे या लढवय्या तरुणीचे नाव आहे.
दुर्गम गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा गावची रहिवासी असलेल्या कविताचे वडील शेती करतात. या कुटुंबीयांकडे अवघी पाच एकर शेती आहे. त्यामध्ये या भागातील मुख्य पीक धान घेतले जाते. कवितासह कुटुंबात तिच्या दोन बहिणी असून त्यांची लग्न झाली आहेत. घरच्या परिस्थितीची जाण असलेल्या कविता यांनी नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर २०१६ ते २०१८ या कालावधीत नागपूर कृषी महाविद्यालयातून बीएसी (ॲग्री) आणि एमएससी (अँग्री) हे २०२१ या वर्षात अकोला कृषी महाविद्यालयातून पूर्ण केले. अकोला येथे शिक्षण घेत असताना कविताची पावले कृषी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा फोरमकडे वळली.
कोणतीही अतिरिक्त शिकवणी न लावता याच ठिकाणी तासन् तास अभ्यासाला बसत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यानुसार कविताने पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून परिस्थितीला दोष देत निव्वळ रडत बसणाऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
नुकताच स्वीकारला प्रभार
अल्पभूधारक कुटुंबातील कविता हरिणखेडे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देत ती उत्तीर्ण केली. त्याआधारे त्यांची नियुक्ती वरोरा (चंद्रपूर) उपविभागीय कृषी अधिकारी पदी करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २१) त्यांनी आपला प्रभार स्वीकारला. पहिल्या टप्प्यात कामकाज शिकण्यावर भर देत त्यानंतरच्या काळात कृषिपूरक योजनांच्या प्रसारावर भर देणार असल्याचे कविता यांनी सांगितले.
सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे घरची परिस्थिती बेताची होती. त्याची जाण ठेवली त्यामुळे पुढील बाबी सोप्या झाल्या. माझे संपूर्ण शिक्षण जिल्हा परिषद शाळा, नवोदय विद्यालय तसेच शासकीय कृषी महाविद्यालयातून झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अकोला कृषी विद्यापीठातील स्टडी फोरमची फार मदत झाली.
– कविता हरिणखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी, वरोर, चंद्रपूर