मतदान व मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद

31

चंद्रपूर दि.15 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदान (20 नोव्हेंबर) व मतमोजणी (23 नोव्हेंबर) या दोन्ही दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी दिले आहेत.

            जिल्ह्यात पडोली, नवेगावमोर, गेवराबु, नेरी, पिपर्डा, आनंदवन, खांबाडा, मुल, चिंचाळा, मोहाडी, वनसडी, भद्रावती, मुधोली, विरूर स्टेशन, पाचगाव, धाबा, पारडी, तळोधी, पिंपळगाव, वांदूरा, दिघोरी, चौगान येथे दर बुधवारला तर दर शनिवारला राजुरा शहर येथे आठवडी बाजार भरतो. नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण स्तरावर भरणा-या आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मार्केट अँड फेअर ॲक्ट अधिनियम, 1862 चे कलम 5 (अ ) मधील तरतुदीनुसार हे सर्व आठवडी बाजार 20 व 23 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा हक्क सर्वाना बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र व्यावसायिक व बाजारातील विक्रेते आपला व्यवसाय बंद ठेवत नाही. परिणामी अनेकजण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात, यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.