राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता

6

मतदानासाठी नागरिकांमध्‍ये दिसला प्रचंड उत्‍साह

मता मतांच्या गलबल्यात ही, पडली निवडणूक पार
निर्भिड मतदानाने आपुल्या, झाली निवडणूक साकार
लोकशाहीचे रक्षण करण्या, मतदान महत्त्वाचे
म्हणून मानतो अपुले आम्ही, खूप खूप आभार

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य बाजावताना दाखविलेला उत्साह कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

‘निकालाची चिंता न करता गोरगरिबांच्या कल्याणासाठी आजपर्यंत निवडणूक लढविली. नेहमीप्रमाणे यंदाही विकासाचा संकल्प घेऊन जनतेशी संवाद साधला. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झालो. अस्मानी संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलो. संवेदनशील जनतेने प्रचारादरम्यान मला भरभरून आशीर्वाद दिलेत. आज मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्‍या. राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लोकशाहीच्‍या या उत्‍सवात उत्‍स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही चंद्रपूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी चंद्रपूर जिल्ह्यातील मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो, अशा भावना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

जनसेवा कायम राहणार
निवडणुकीतील विजय आणि पराजयाच्या पलीकडे जाऊन भाजपाने कायम जनतेनी सेवा केली आहे व यापुढेही ही जनसेवा आम्‍ही निरंतर करत राहू. भाजपा-महायुतीच्‍या माध्‍यमातून हा सेवायज्ञ आम्ही असाच पुढे नेणार आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.