शिष्यवृत्ती अर्ज भरा ३० नोव्हेंबरपूर्वी; पाचवी, आठवीसाठी परीक्षा २०२५ च्या फेब्रुवारीत

41

5th and 8th scholarship exam 2024 registration- पाचवी आणि आठवी या दोन वर्गांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याकरिता ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने ही परीक्षा आयोजिण्यात येते. पाचव्या वर्गाकरिता पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तर आठव्या वर्गासाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांचे आयोजन दरवर्षी केले जाते.

यंदा ही परीक्षा ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसण्याकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. नियमित शुल्कासह हे अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याकरिता १ ते १५ डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. अतिविलंब शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना या परीक्षेचे अर्ज सादर करता येतील. त्यासाठी १६ ते २३ डिसेंबरदरम्यान अर्ज सादर करावे लागतील. याशिवाय, अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३० डिसेंबर या कालावधीतही अर्ज सादर करता येतील. ३१ डिसेंबरनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेने कळविले आहे.

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीसह शासकीय विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन येथील प्रवेशांसाठीही या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२.३० या काळात प्रथम भाषा आणि गणित या विषयांची परीक्षा होईल. प्रथम भाषेचा पेपर हा ५० गुणांचा तर गणित विषयाचा पेपर १०० गुणांचा राहील. दुपारी २ ते ३.३० या वेळेत तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे पेपर होतील. तृतीय भाषेचा पेपर ५० गुणांचा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर १०० गुणांचा राहील. पाचव्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यासाठी कमाल वय ११ वर्षे तर आठवीच्या परीक्षेला बसण्यासाठी कमाल वय १४ वर्षे अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे.