कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तेविसावी बैठक संपन्न

40

कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *तेवीसावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी ग्राम *मरेगांव* ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. या प्रसंगी, मरेगांव या गावाचे सरपंच सौ. ज्योत्सना पेन्दोरे, पोलीस पाटील श्री. पुंडलिक जवादे, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “ *रब्बी पिकांचे व्यवस्थापन* ” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम महाविद्यालच्या कृषिविद्या विभागाच्या विषयतज्ञ *प्रा. मोहिनी पुनसे* , यांनी गहू पिकांच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली त्यामध्ये पिकाच्या नाजूक अवस्था जसे, मुकुटमुळे फुटण्याची सुरुवातीची अवस्था, जास्तीत जास्त फुटवे येण्याची अवस्था, फुलोरा अवस्था, दाण्याची दुधाळ अवस्था यामध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये. जर मुकुट फुटण्याची सुरुवात झाली आणि पाण्याची कमतरता असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात ३३टक्के पर्यंत घट येऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांनी गहू पिकामध्ये पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी असल्यास, कमी पाण्यामध्ये येणारे तेलबिया पिके जसे मोहरी, जवस यांची लागवड करण्यास प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी मुख्य अन्नद्रव्यांसोबत सुष्मअन्नद्रव्य सुद्धा देण्याची गरज असल्याचे सांगितले आणी पिकाची फेरपालट केल्यास रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. *डॉ. गितांशु डिंकवार* , वनस्पतीरोग विषयतज्ञ, यांनी हरभरा पिक लागवडीपूर्वी बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केल्यास मररोग, मुळकूज यांसारख्या रोगांना प्रतिबंध घालू शकतो, हरभऱ्यावरील शेंगा पोखरणारी हेलीकोव्हरपा अळीचे व्यवस्थापनाकरिता एच. ए. एन. पी. व्ही. प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त  अळ्यांचा अर्क फवारावे, अळ्यांनी आर्थिक नुकसानाची पातळी गाठल्यानंतर क्विनालफॉस  २५ ई. सी. २८ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ एस. जी. ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे असे सांगितले तसेच गहू व कपाशी पिकांवर येणारे रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापानाबद्दल मार्गदर्शन केले. *प्रा. देवानंद कुसुंबे* कृषिविद्या विषयतज्ञ यांनी दुबार पेरणी  धान पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी अधिक उत्पादन देणारे वाण, बीजप्रक्रिया, ताणनियंत्रण, पाण्याचे योग्य नियोजन, यावर मार्गदर्शन केले, तसेच हरभरा पिकांचे व्यवस्थापन, गांडूळ खत बनविण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर महाविद्यालच्या विस्तार शिक्षण विभागाच्या *प्रा. मनीषा लवणकर* यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने तंत्रज्ञान विकसित केलेल्या विविध ॲपबद्दल आणि विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या कृषिसंवादिनीबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी दोन उपस्थित शेतकऱ्यांनी डॉ. पंदेकृवि चे कृषि विषयक संपूर्ण तंत्रज्ञान असलेली कृषिसंवादिनी सुद्धा खरेदी केली. 

  • सदर कार्यक्रमास एकुण *३१ शेतकरी* व शास्त्रज्ञ उपस्थित होते. *प्रा. मनीषा लवणकर* यांनी सदर कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले असे सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल  यांनी कळविले आहे.