चंद्रपूर, दि. 23: गुड गव्हर्नस विक-2024 अंतर्गत “प्रशासन गाव की और” मोहीम दि. 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच शिबिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून ऑनलाईन सेवा पुरविण्यात येत आहेत. नागरिकांनी शासकिय कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीचे विहित कालावधीत निवारण करणे. प्रलबिंत तक्रारीचा निपटारा करण्यासोबतच, जिल्ह्यामध्ये लोकाभिमुख कामे करुन प्रशासन गतिमान करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, सर्व तहसिलदार, विविध विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, सर्वसामान्य जनतेची कामे प्राधान्याने निकाली काढावीत. जनतेच्या समस्या व तक्रारी जाणून घ्याव्यात. 21 दिवसाच्या वर प्रलंबित असलेली तक्रारींची यादी करावी. तसेच सदर प्रकरणे प्रलंबित राहता कामा नये याबाबत दक्षता घ्यावी. केंद्र शासनामार्फत सदर सुशासन सप्ताहाचे मॉनिटरींग केल्या जात आहे. त्यामुळे विभागांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग करावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी आपल्या विभागामार्फत सुशासन संबंधात केलेल्या उत्कृष्ट कामाची, वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती व संबंधित फोटो सादर करावेत.
निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार म्हणाले, गत चार वर्षापासून गुड गव्हर्नन्स विक साजरा केला जातो. या माध्यमातून जनतेपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून कॅम्पेन मोडमध्ये सुविधा व सेवा पुरविण्यात येतात. या सप्ताहात (19 ते 22 डिसेंबरपर्यत) जिल्हा तसेच तालुकास्तरावर विविध विभागाच्या माध्यमातून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरे, शेतकऱ्यांना सातबारा, जन्म/मृत्यु दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर महत्वपुर्ण दाखले वितरीत करण्यात आले.