चंद्रपूर, दि. 7 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 11 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपुर मार्फत विशेष मोहिमेव्दारे जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच त्रुटीपूर्तता व अर्ज सुध्दा स्वीकारण्यात येईल.
सत्र 2024-25 मध्ये प्रवेशित इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज दाखल केलेला नाही. तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास सीईटी देऊन 2025-26 मध्ये प्रवेश घेऊ इच्छीत असणा-या (तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाला प्रवेशीत असणारे ज्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे) विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय पर्वाच्य विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घ्यावी.
15 ते 17 एप्रिल व 21 ते 25 एप्रिल 2025 दरम्यान त्रुटीपुर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज दाखल केले आहे, परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांची प्रकरणे त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी वरील दिनांकास किंवा त्यापुर्वी सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी, असे समितीचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.