मूल कृषी विभागामार्फत बदलल्या हवामानास अनुकूल शेती पद्धतीस चालना मिळावी, याकरिता जागतिक बँक अर्थसाहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत मूल तालुक्यामधील टेकाडी येथे या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. मूल तालुक्यातील एकूण ३३ गावे योजनेत आहेत. सर्व गावांत लोकसहभागातून नियोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
टेकाडी येथे जनजागृतीकरिता सायंकाळी मशाल फेरी काढण्यात आली. त्यानंतर योजनेचा उद्देश व लोकसहभागातून सूक्ष्म नियोजन प्रक्रियेबाबत माहिती तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेवर माहिती तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांनी दिली.
या प्रकल्पांतर्गत विद्यार्थी व गावकरी यांच्यासह जनजागृतीसाठी प्रभातफेरी.लोकसहभागातून गाव नकाशा, हवामान बदल व शेती पद्धती यांविषयी विविध वयोगटातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. लक्ष्य गट चर्चेमध्ये चंद्रपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी गजानंद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून हवामान बदलामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरिता प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विविध बाबींविषयी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांशी सखोल चर्चा करून मृद व जलसंधारण कामे, पूरक व्यवसाय, बचत टांकरिता नियोजनाने घेण्याबाबतच्या बाबी व अधिक उत्पन्न वाढविण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोबतच शिवार फेरी काढून शिवारामध्ये येत असलेल्या मूळ व जलसंधारणाची कामांची पाहणी करण्यात आली व पाणी पातळी मोजण्यात आली. यावेळी टेकाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश चौधरी, पोलिस पाटील प्रमोद बोमनवार, बंडू गोहणे, रवींद्र चौधरी उपस्थित होते.