मूल ते जानाळा रस्त्याची दूरवस्था

78

मूल ते जानाळा रस्त्याची दूरवस्था
मूल :— मूल ते जानाळा रस्त्याची चांगलीच दूरवस्था झाली आहे.सदर राज्य मार्ग आता राष्टीय महा मार्ग झाल्याने संबंधित राष्टीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रोपवाटीका जवळील मार्ग चांगलाच उखडल्या गेला आहे. सदर मार्ग आमच्या अखत्यारीत येत नाही असे सांगून बांधकाम विभाग महामार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत.तर दुसरीकडे या मार्गावर झालेल्या दूरवस्थेकडे राष्टीय महामार्ग विभाग कानाडोळा करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परंतु उखडलेंल्या मार्गाचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. चंद्रपूर मार्गावर ठिकठिकाणी गतीरोधक उभारण्यात आले आहेत.या गतीरोधकाना झेब्रा क्रासिंगच्या पटयांनी साधे रंगविण्यात सुदधा आले नाही. त्यामुळे सदर गतीरोधक दिसण्यास वाहनचालकांना अडचण निर्माण होत आहे.गतीरोधक दिसत नसल्याने अनेकदा वाहनचालकांचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे निदर्शनास पडत आहे.अशा प्रकारामुळे अपघात होण्याची भिती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. जिल्हयातील वाहतूक विभाग आणि बांधकाम विभागाने सदर गतीरोधकांवर झेब्रा क्रासिंग पटटे रंगवून गंभीर अपघात होण्यापासून वाहनचालकांना वाचवावे तसेच जानाळा मार्गावरील उखडलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.