मूल तालुक्यात ४३ उमेदवार अविरोध राजगड आणि उथळपेठ अविरोध निवडणुकीचे मानकरी

51

मूल (प्रतिनिधी) :-     मूल तालुक्यातील 49 पैकी 37 ग्राम पंचायतीच्या होवू घातलेल्या निवडणुकीत दोन ग्राम पंचायत सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याने येत्या 15 जानेवारी रोजी तालुक्यातील 35 ग्राम पंचायतीची निवडणुक होणार आहे. 317 सदस्यांपैकी 43 उमेदवार बिनविरोध झाल्याने 274 जागांसाठी निवडणुक होणार असुन निवडुण दयावयाच्या 274 ग्राम पंचायत सदस्यांसाठी आता 700 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे निवडणुक चांगलीच रंगतदार होईल अशी चर्चा आहे. ग्राम पंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे म्हणून भाजपा, काॅंग्रेस, राकाॅपा आणि शिवसेना कंबर कसुन कामाला लागली आहे. निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांना राजकिय पक्षाचे अधिकृत निवडणुक चिन्ह नसल्याने मतदारांची गोची होणार असली तरी गावांतील राजकिय पक्षाचे कार्यकर्ते अधिकृत निवडणुक चिन्हा अभावी विविध नांवाने आघाडया निर्माण करून नशिब अजमावत आहेत. तालुक्यातील प्रत्येक गांवात काॅंग्रेस आणि भाजपा पोहोचली आहे. परंतु राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी आणि शिवसेना अनेक गांवात पाहिजे त्या प्रमाणांत अजुनही पोहोचलेली नाही, त्यामूळे अनेक गावांत राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी आणि शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात नाहीत. निवडणुक होत असलेल्या काही गांवामध्यें काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस युती करून निवडणुक लढवित आहेत. राज्यात महायुती सरकार असल्याने ग्राम पंचायत निवडणुकीत काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना महायुती करून भाजपाला शह देतील, अशी शक्यता वर्तविल्या जात होती परंतू स्थानिक पातळीवर महायुती न करता प्रत्येकाने नशीब अजमावण्याची तयारी केल्याने प्रत्येक गांवात निवडणुक चुरशीची होणार आहे. तालुक्यातील 37 पैकी राजगड येथील नऊ पैकी नऊ आणि उथळपेठ येथील सात पैकी सात या दोन ग्राम पंचायत सदस्यांची निवडणुक बिनविरोध झाल्याने आता राजोली, डोंगरगांव, मुरमाळी, चिखली, गांगलवाडी, मोरवाही, चिमढा, टेकाडी, मरेगांव, मारोडा, भादुर्णी, चितेगांव, भोवरला, बोरचांदली, फिस्कुटी, विरई, चांदापूर, काटवन, हळदी, जुनासुर्ला, पिपरी दिक्षीत, येरगांव, नवेगांव भुजला, कोसंबी, चिरोली, जानाळा, केळझर, सुशी, बागांव, नलेश्वर, खालवसपेठ, चिचाळा, नांदगांव, गोवर्धन आणि बोंडाळा बुजरूक या 35 ग्राम पंचायतीची निवडणुक होणार आहे. निवडणुक होत असलेल्या केळझर, मरेगांव, चितेगांव, डोंगरगांव आणि बोरचांदली येथील प्रत्येकी एक, विरई, काटवन चक, हळदी, येरगांव आणि खालवसपेठ येथील प्रत्येकी दोन, सुशी दाबगांव आणि गांगलवाडी येथील प्रत्येकी तीन आणि भवराळा येथील सहा अश्या एकुण सत्तावीस उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवार न मिळाल्याने मतमोजणी अंती त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यांत येणार आहे. तालुक्यात मोठी ग्राम पंचायत म्हणून ओडखल्या जाणा-या राजोली, नांदगांव आणि मारोडा ग्राम पंचायतीची निवडणुक अनेकांसाठी प्रतिष्ठेेची झाली असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनात जि.प. अध्यक्षा तथा भाजपा तालुकाध्यक्षा संध्या गुरनूले किल्ला लढवित आहेत. त्यांचे नेतृत्वात भाजपा कार्यकर्ते तर पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळु धानोरकर यांचे मार्गदर्शनात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत तालुक्यात काॅंग्रेसची धुरा सांभाळून आहेत. रावत यांचे नेतृत्वात काॅंग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी तर जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे आणि तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांचे नेतृत्वात नितीन येरोजवार ग्राम पंचायत निवडणुकांमध्यें खाते उघडण्याचा प्रयत्न करणार आहे. काही ठिकाणी नशिब अजमावत असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खाता उघडतील अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.