मूल :— तालुक्यातील भेजगाव परिसरात चिचाळा मार्गे मूल वरून विद्युतपुरवठा होत आहे. या परिसरात जवळपास 20 गावे आहेत. मात्र,मूल शिवाय कुठेही विद्युत केंन्द्र नाही. विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे भेजगाव या केंद्र स्थानी असलेल्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीने 33 केव्ही विद्युत उपकेंद्र उभारावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हिवाळयाचे दिवस असले, तरी विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो.पावसाळयाच्या दिवसांत तर हा लपंडाव,अधिकच वाढतो. तसेच वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळे कधी कमी अधिक दाबाचा वीजपुरवठा होतो. परिणामी घरगुती उपकरणे,कृषी पंप निकामी ठरत असल्याची बोंब ग्रामस्थंामध्ये आहे. वाढत्या औद्योगिकीरणामुळे ग्रामीण नागरिकांना रोजगाराचे साधन मिळाले. छोटया मोठया उद्योगातून नागरिक उदरनिर्वाह करीत आहेत
त्यामध्ये पीठ गिरणी,राईस मिल,मेडिकल यासारख्या उद्योगात विजेचा वापर होतो. त्यामूळे विजेची मागणी वाढली आहे. मात्र विजेचा लपंडाव व कमी दाबाचा वीजपुरवठा याचा फटका या उद्योगांना बसत आहे.
विजेचा वाढता लपंडाव व कमी दाबाचा विद्युतपुरवठा यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. या समस्येतून सुटका व्हावी म्हणून भेजगाव येथे विद्युत उपकेंन्द्र उभारावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.