अल्पसंख्यांक समाजाच्या उमेदवारांकरिता पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 9 मार्च : अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये समान संधी प्राप्त व्हावी याकरिता शासनाद्वारे प्रशिक्षण कार्यान्वित करण्यांत आलेले आहे. या अनुषंगाने पोलिस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन 2020-21 करीता चंद्रपूर जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन ,बौध्द, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी सदर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी दिनांक 25 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हा मुख्यालयातील पोलीस ग्राउंड चंद्रपूर येथे उपस्थित राहुन अर्ज सादर करावेत.
प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी नमूद अटी व शर्ती नुसार प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावे, उमेदवार हा अल्पसंख्याक समाजातील 18 ते 25 वर्षे या वयोगटातील असावा. उमेदवारांची उंची पुरुषाकरिता कमीत कमी 165 सेंमी व महिलाकरिता 155 सेंमी. असावी, छाती पुरुषंकरिता 79 सेंमी व फुगवून 84 सेंमी असावी, शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण असावी. रहिवासी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत, उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक राहील. उमेदवार शारिरिक दृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.
निवडलेल्या उमेदवारांपैकी किमान 70 उमेदवार मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील, 20 उमेदवार बौध्द समाजातील,4 उमेदवार ख्रिश्चन समाजातील, 4 उमेदवार जैन समाजातील आणि प्रत्येकी एक उमेदवार शीख व पारसी समाजामधून निवडण्यात येणार आहे. ख्रिश्चन, जैन, शीख, आणि पारसी समाजामधून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर अल्पसंख्यांक समाजमधील उमेदवार निवडण्यात येतील. सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी दोन महिन्यांचा राहील, असे जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.