मनपाच्या स्वतंत्र ४५ खाटांच्या कोविड रुग्णालयाला सभागृहाची मंजुरी

51

मनपाच्या स्वतंत्र ४५ खाटांच्या कोविड रुग्णालयाला सभागृहाची मंजुरी
चंद्रपूर, ता. २२ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यास आज गुरुवारी (ता. २२) महानगर पालिकेच्या राणी हिराई सभागृहात झालेल्या ऑनलाइन विशेष बैठकीत सभागृहाने मंजुरी दिली.

सभागृहात महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, भाजप व मित्रपक्षाचे गटनेते वसंत देशमुख, बसपाचे गटनेते अनिल रामटेके, चंद्रपूर शहर विकास आघाडीचे गटनेते प्रदीप देशमुख, शिवसेनेचे गटनेते सुरेश पचारे तसेच सर्व नगरदेवक- नगरसेविका आभासी माध्यमाद्वारे उपस्थित होते.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कोव्हिड आपत्ती व्यवस्थापन ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २२.०४.२०२१ रोजी दुपारी १.०० वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, “राणी हिराई” मनपा सभागृहात पार पडली. कोव्हीड रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यावर सभागृहातील मान्यवर आणि ऑनलाइन उपस्थित नगरसेवकांनी चर्चा केली.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. हे कोव्हीड रुग्णालय सुरु करण्यासाठी येणारा संभाव्य खर्च अंदाजे रु. २.२५ कोटी (अक्षरी रुपये दोन कोटी पंचेविस लक्ष फक्त) अपेक्षित आहे. समोर टप्प्याटप्याने खाटा वाढविण्यात येतील. चंद्रपूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, कोविड -१ ९ या विषाणूची भविष्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरीता महानगर पालिका प्रयत्नरत आहे.

सर्वसोयी सुविधायुक्त रुग्णालय होईल : आयुक्त राजेश मोहिते
महानगर पालिका प्रशासनातर्फे प्रस्तावित ४५ खाटांचे कोविड रुग्णालय हे सर्वसाधारण कोव्हीड केअर सेंटर नसून, ते सर्वसोयी सुविधायुक्त रुग्णालय निर्माण होईल, असे आयुक्त राजेश मोहिते यांनी याप्रसंगी सांगितले. येथे सर्व बेडवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध राहील. शिवाय व्हेंटिलेटर सुविधादेखील असणार आहे. बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबुपेठ इथे कोविड रुग्णालय सुरु करण्यासंदर्भात पाहाणी करण्यात आली. येथे सुविधाची पूर्तता करून रुग्णालय सुरु करण्याचे विचाराधीन आहे. एक कोटीच्या आमदार निधीचे नियोजनदेखील सुरु असल्याचे सांगितले. कोव्हीडमुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाजवळ अंत्यसंस्काराच्या वेळी नातलगांना उपस्थित राहण्याची कोणतीही परवानगी देता येणार नाही, असे आयुक्त राजेश मोहिते यांनी यावेळी स्पष्ट केले.