इंजिनीअरिंग, फार्मसी प्रवेशाची सीईटी जुलैअखेरीस

99

राज्यात बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे यंदा बीए, बी. कॉम, बी.एस्सी अशा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विनामूल्य सीईटी घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. इंजिनीअरिंग, फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात होईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

 

सामंत म्हणाले, बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये कुलगुरू, सीईटी सेल आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी आहेत. परीक्षा रद्द झाल्यामुळे अचानक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. राज्यात एकच सीईटी परीक्षा घ्यावी पिंवा विद्यापीठस्तरावर सीईटी घेण्यात यावी याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थी, पालक, प्राचार्य, संस्थाचालक अशी सर्वांची मते जाणून सीईटीबाबत अंतिम निर्णय होईल. विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी शुल्क भरले आहे. त्यामुळे ही सीईटी परीक्षा विनामूल्य आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

वर्षभरात प्राध्यापक भरती पूर्ण

राज्यात प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्राध्यापक महाविद्यालयामध्ये रुजू होतील. आर्थिक अडचणी असल्याने तिजोरीकडे पाहून किती प्रमाणात प्राध्यापकांची पदे भरायची, याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी उमेदवारांसोबत चर्चा सुरू आहे, असेही सामंत म्हणाले.