TET Exam : भावी शिक्षकांना मोठा दिलासा; अखेर शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर

105

पुणे – शिक्षक होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी दि. 10 ऑक्‍टोबर 2021 रोजी होणार आहे. टीईटीसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. करोनामुळे गेल्या दोन वर्षात लांबणीवर पडलेली ‘टीईटी’ परीक्षेच्या तारखा गुरूवारी जाहीर झाल्याने भावी शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ‘टीईटी’ परीक्षा होत आहे. इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, अनुदानित आणि विनाअनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्‍तीसाठी उमेदवारांना ही सीईटी होणे अनिवार्य आहे. या परीक्षेची सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली.

गेल्या दहा दिवसांपूर्वी राज्यातील शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने टीईटी घेण्यास मान्यता दिली होती. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये सरकारकडून 6 हजार 100 अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी टीईटी आयोजित केली जात आहे.

2019 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर 2020 मध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेणे शक्‍य झाले नव्हते. मात्र यंदा शिक्षण विभागाने परीक्षा घेण्यास परवानगी दिली आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज वेळापत्रक प्रसिद्ध केले.

टीईटीचे वेळापत्रक
1. ऑनलाइन अर्जासाठी मुदत : 3 ते 25 ऑगस्ट
2. प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध : 25 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर
3. टीईटी पेपर 1 : 10 ऑक्‍टोबर, सकाळी 10.30 ते दुपारी 1
4. टीईटी पेपर 2 : 10 ऑक्‍टोबर, दुपारी 2 ते 4.30