आधार कार्डवरील माहिती अपडेट करणार असाल तर जाणून घ्या नवा बदल

59

नवी दिल्ली, 06 सप्टेंबर: खासगी काम असो की सरकारी, आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक बनले आहे. अनेकदा आधार कार्डवरील नावात काही तरी चूक किंवा आपण दिलेल्या पत्त्यात चूक झालेली असते. आधार कार्डवरील नावात किंवा पत्त्यात झालेली चूक दुरूस्त (Update Aadhaar Card) करताही येते. आधार कार्डमुळे संबंधित व्यक्ती कोणाचा मुलगा, मुलगी, पत्नी आहे, अशा नात्यांबाबत माहितीही मिळत होती. पण आता आधार कार्डमधील माहिती अपडेट करीत असाल, तर तुमच्या वडिलांशी किंवा पतीशी असलेल्या तुमच्या नात्याची ओळख कार्डमध्ये उघड होणार नाही. दैनिक जागरणने याबाबत वृत्त दिलं आहे. आधारकार्डमध्ये बदल करायचा असेल, तर तुमच्या वडिलांशी किंवा पतीशी असलेल्या नात्याची ओळख कार्डमध्ये उघड होणार नाही. आधार कार्ड आता नातेसंबंध उघड करणारा दस्तऐवज (Document) नाही. हे सांगण्याचं कारण असं की सरकारने बदललेल्या पद्धतीमुळे दिल्लीतील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला चकित करणारा अनुभव आला. दिल्ली पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक रणधीरसिंग यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डवरील घराचा पत्ता बदलला, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या आधारकार्डवर ‘वाइफ ऑफ’ ऐवजी ‘केयर ऑफ’ (care of) असे प्रिंट होऊन त्यासमोर रणधीरसिंग यांचे नाव आले.

कंप्युटर सिस्टीममध्ये (computer system) समस्या असल्यामुळे असं झालं असावं, असं सिंग यांना वाटलं. त्यामुळे आधार कार्ड बदलण्यासाठी ते पोस्ट ऑफिस, बँक आणि इतर अनेक अधिकृत केंद्रांवर गेले, पण त्यांचे नाव ‘केयर ऑफ’ मध्येच येत होते. सिंग हे अशोक विहार पोलीस कॉलनी येथे राहत होते. निवृत्त झाल्यानंतर ते पितामपुरा येथे राहण्यासाठी गेले आहेत. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डवर नवीन घराचा पत्ता अपडेट करण्यासाठी सिंग गेले होते. त्यावेळी त्यांच्या मुलांच्या आधारकार्डवर देखील वडिलांच्या नावाच्या जागेवर ‘केयर ऑफ’ येत होते. यासंदर्भात, भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘2018 मध्ये आधारबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सविस्तर निर्णय होता. त्या निर्णयात, लोकांच्या गोपनीयतेबद्दल बोलले गेले आहे आणि त्या आधारावरच आता आधार कार्डमध्ये नात्यांसंबंधी माहिती दिली जात नाही.’ मात्र, हा बदल कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात झाला, याबाबतची माहिती युआयडीएआय (UIDAI) ने दिलेली नाही.

तर, आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी आयटी मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटरचे (सीएससी) व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी यांनी सांगितले की, ‘आधारमध्ये ‘वाइफ ऑफ’, ‘सन ऑफ’, ‘डॉटर ऑफ’ ऐवजी ‘केयर ऑफ’ असे प्रिंट होत आहे. जर एखाद्याला वाटले ‘केयर ऑफ’ मध्येही कोणाचे नाव द्याचे नाही, तर तसाही पर्याय उपलब्ध आहे. केवळ स्वतःचे नाव आणि पत्ता देऊन आधार कार्ड बनवता येईल. त्यामुळे आधारकार्डमुळे नातेसंबंध निश्चित होणार नाहीत.’ त्यागी पुढे म्हणाले, ’12 अंकी युनिक नंबर आधार कार्डमध्ये दिला आहे. हा नंबरच आधार कार्डचे वैशिष्ट असून तो व्यक्तीचे फिंगर प्रिंट आणि डोळ्यांशी संबंधित आहे. आधार कार्ड बनवल्यानंतर कोणीही त्याचे नाव बदलले तरी त्याला युनिक नंबरने ओळखले जाईल. हे पूर्णपणे वैयक्तिक ओळखपत्र आहे.’ तर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सिंग यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की अगदी एखाद्या कठीण प्रसंगी माझ्या पत्नीला आधार कार्ड दाखवून ती माझी पत्नी असल्याचा पुरावा द्यावा लागलं तर काय होईल? दुसरीकडे, तज्ज्ञांच्या मते आधार कार्डमधील या बदलामुळे जे लोक अनाथ आहेत त्यांनाही आधारकार्ड सहज मिळू शकेल.

आधारकार्ड मधील माहिती अपडेट केल्यानंतर आता नात्याची ओळख कार्डमध्ये उघड होणार नाही. त्यामुळे हे फक्त वैयक्तिक ओळखपत्र राहणार आहे.