मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने आम्हाला पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (The health department exams scheduled for Saturday and Sunday have been postponed)
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलताना म्हणाले, गट-क आणि गट-ड अशा ६२०५ जागा भरण्यासाठी मंत्रीमंडळाने मान्यता दिली होती. या जागा भरत असताना त्यासाठी परीक्षा घेण्याचे काम बाह्य संस्थेला देण्यात आले होते. या परीक्षेसाठी अंदाजे ८ लाख परीक्षार्थींनी नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ही देण्यात आले होते. मात्र या ज्ञासा संस्थेने आपल्याला परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आणखी थोडा कालावधी लागेल, असे कारण पुढे केल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आपल्याला याबाबतची विस्तृत माहिती संकेत स्थळावर मिळेल. त्याचप्रमाणे जिल्हा केंद्रावर देखील आपल्याला माहिती मिळू शकेल. परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. त्याच वेळी शुक्रवारी रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.