चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे. आपल्या शेतातील शेतमालाच्या नोंदी स्वत: शेतक-यांनी घेऊन सदर ॲपवर अपलोड करावयाच्या आहेत. यासंदर्भात शेतक-यांच्या शंकांचे निराकरण करणे, त्यांना ॲपद्वारे नोंदी घेण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच प्रत्यक्ष शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पाच तालुक्यांचा दौरा केला.
यात भद्रावती, वरोरा, नागभीड, सिंदेवाही आणि मूल या तालुक्यात ई-पीक पाहणीसंदर्भात जिल्हाधिका-यांनी ‘ऑनफिल्ड’ आढावा घेतला. वरोरा तालुक्यात जिल्हाधिका-यांनी सालोरी, पिंपळगाव आणि खांबाडा गावांना भेटी देऊन ई – पीक पाहणीचे प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने-सोळंके, नायब तहसीलदार मधुकर काळे, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच सालोरी येथील सहदेव रामन्ना, पिंपळगाव येथील गणेश ठाकरे आणि खांबाडा येथील शेतकरी रमेश मेश्राम उपस्थित होते.
शेतक-यांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शासनाने सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात सर्व शेतकरी बांधवांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा. तसेच युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्यास शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे. आपल्या गावाची 100 टक्के पीक पाहणी ही ई – पीक पाहणी ॲपवर 30 सप्टेंबर पर्यंत नोंदवून घ्यावी. प्रत्येक शेतक-याने आपल्या पिकांची नोंद स्वत: घेऊन ॲपवर अपलोड करणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा प्रश्न असल्यामुळे ज्या मोबाईलचे नेटवर्क आहे, त्याचा उपयोग करावा. एका ॲन्ड्राईड मोबाईलवरून 20 शेतक-यांच्या नोंदी घेता येते, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, तरुण पिढी ॲन्ड्राईड मोबाईलचा वापर करीत असल्यामुळे गावातील तरुणांनी ई-पीक पाहणी करण्यास मदत करावी. विशेष म्हणजे आपल्या आई-वडीलांना या कामात मुलांची मदत मिळेल तसेच त्यांची शेतीशी नाळ जुळविणे शक्य होईल. त्यामुळे गावस्तरीय यंत्रणेने तसेच स्थानिक सरपंच व लोकप्रतिनिधींनी यासाठी आपल्या गावातील तरुणांना प्रोत्साहित करावे. तलाठ्यांनी या कामी गावातील युवक व युवतीचे स्वतंत्र गट बनवून त्यांच्या मदतीने येत्या 3 दिवसांत जास्तीतजास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिका-यांनी भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढा, टाकळी व नंदोरी या गावांमध्ये,
मूल तालुक्यात राजोली, डोंगरगाव आणि चिखली येथे तर सिंदेवाही तालुक्यात पळसगाव जाट, मेंढामाल, लोणवाही व किन्ही या गावात ई-पीक पाहणी संदर्भात भेट दिली. तालुक्यातील सर्व शेतक-यांचा पीक पेरा ई- पीक पाहणी ॲपद्वारे पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उभारण्यात येत असलेल्या ऑक्सीजन प्लॉटचीसुध्दा जिल्हाधिका-यांनी पाहणी करून सदर काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिक्षक यांना दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ, तहसीलदार गणेश जगदळे, तालुका कृषी अधिकारी श्री. महल्ले, मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्यासह गावातील सरपंच, पोलिस पाटील तसेच तलाठी व मंडळ अधिकारीसुद्धा उपस्थित होते.
असे आहेत ई – पीक पाहणी ॲपचे फायदे : 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरूवात झाली आहे. या ॲपमुळे पिकांचे अचूक क्षेत्र वेळेत समजणार असून आर्थिक पाहणी, भविष्यातील कृषी नियोजन करणे शक्य होईल. नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना वेळेत अचूकपणे नुकसान भरपाई देण्यास देणे तसेच पीक कर्जाचा लाभ देणे सुलभ होईल. शिवाय स्वत:च्या पिकांची नोंद स्वत: केल्याचे मानसिक समाधान मिळून आपण केलेली नोंद लगेच सातबारावर पाहता येईल. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यास सदर ॲप उपयुक्त आहे.