नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका-2021 नगरपंचायत निवडणुकांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित

65

Ø मतमोजणी आता 19 जानेवारी 2022 रोजी

चंद्रपूर, दि. 17 डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या (आज दि.17 डिसेंबर) रोजीच्या आदेशान्वये, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाकरिता अधिसूचित करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व आरक्षित जागा या तात्काळ अनारक्षित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

            उपरोक्त नगरपंचायतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार ना.मा.प्र. करिता आरक्षित असलेल्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवायच्या जागांसाठी सुधारित फेर सोडतीचा कार्यक्रम-2021 व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे, त्यानुसार आरक्षण सोडत दि. 23 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.

नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण पदाकरिता सुरू असलेल्या कार्यक्रमानुसार होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून त्या निवडणुकांची मतमोजणी दि. 19 जानेवारी 2022 रोजी होईल. तसेच सुधारित कार्यक्रमानुसार सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेचा कालावधी हा मतमोजणी सुधारित दिनांकापर्यंत म्हणजेच 19 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहील, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.