मुल शहरातील सोयीसाठी केलेले रस्ते झाले गैरसोयीचे!,अतिक्रमणाच्या नावाखाली अनेक रस्त्याचे काम अर्धवट

43

जुन्या वस्तीधील आजही रस्ता अपूर्ण,अतिक्रमणाच्या नावाखाली अनेक रस्त्याचे काम अर्धवट 

नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील बहुतांश रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले असले तरी योग्य नियोजनाअभावी अनेक रस्ते उंच आणि घर खाली झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याने ये जा करणे नागरीकांना सोईचे व्हावे म्हणून शासनाच्या कोट्यवधी रुपयांमधून शहरातील मुख्य मार्गासह अनेक वार्डातील रस्त्याचे मजबुतीकरण करताना नाली आणि सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मुसळधार पावसाने रस्ते आणि नाली बांधकामातील निकृष्ठता आपसुकच डोळयासमोर आली. लाखो रुपये खर्चाचे रस्ते आणि नाल्या फुटू लागल्या असून वापरलेला सिमेंट वाहून गेल्याने गिट्टी दिसू लागली आहे.
सदर कामात नियोजनाचा अभाव, अयोग्य मोजमाप आणि निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याने झालेले बांधकाम नागरिकांना गैरसोयीचे वाटू लागले आहे. शहरातील अनेक रस्ते आणि नाल्या उंच झाले असून घर खाली झाल्याने रस्त्यावरील पाणी घरात शिरल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते आणि नाली बांधकाम करताना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले गट्टू अनेक ठिकाणी फुटले असून अनेक ठिकाणी दबल्या गेले आहेत तर काही ठिकाणी लावण्यातच आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी तयार झालेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या अनेक नाल्यांवर लगतच्या रहिवाशांनी वाहन काढणे सोईचे व्हावे म्हणून पक्के स्लॅब टाकल्याने नाल्यांचा उपसा करणे सफाई कर्मचार्‍यांना त्रासाचे झाले असून यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचण येत आहे.
शहरातील अनेक रस्त्याचे सिमेंटीकरण झाले असले तरी अनेक रस्ते आजही नगर व बांधकाम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपूर्ण आहेत. विहिरगावमधील बुद्धविहार चौकापासून डॉ. मुखर्जी वाचनालयापयर्ंत पाचशे ते सातशे मीटर रस्त्याचे काम अपूर्ण असून सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. वर्दळीच्या सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने याठिकाणी आजपर्यत अनेकदा सायकल व दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाले आहे.

जुन्या वस्तीधील आजही रस्ता अपूर्ण

अतिक्रमणाच्या नावाखाली अनेक रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आली असून काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने येथील अतिक्रमण काढले, परंतु अतिक्रमणमुक्त झालेल्या रस्त्याच्या बांधकामाला प्रशासनाने अजुनही सुरूवात केलेली नाही. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चौकापासून हनुमान मंदिरकडे जाणार्‍या मार्गाचे अजूनही सिमेंटीकरण न झाल्याने सदर मार्ग अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. बुद्ध विहार चौकापासून विहीरगाव परिसरातील मराठी शाळेपयर्ंत गेलेल्या रस्त्याची पूर्णत: चाळणी झाली आहे. शहरातील बहुतांश मागार्चे सिमेंटीकरण झाले असले तरी अनेक रस्ते आजही दुर्लक्षीत आणि समस्याग्रस्त असल्याने भाऊंच्या स्मार्ट सिटीच्या स्वप्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.