द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती एनडीएच्या उमेदवार होत्या, यूपीएचे यशवंत सिन्हा यांचा पराभव

242

वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १0 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १00 टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४0२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसर्‍या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांमधील ५0 टक्के मते मिळाली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.
दुसर्‍या फेरीत ८१२ मतांच्या फरकाने आघाडीवर
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या दुसर्‍या फेरीत त्या ८१२ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. मुर्मू यांना दुसर्‍या फेरीपर्यंत १३४९ मते मिळाली. या मतांचे मूल्य ४,८३,२९९ आहे. तर दुसर्‍या फेरीपर्यंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली होती. या मतांचे मुल्य १,८९,८७६ आहे.
१७ खासदारांची मते फुटली
राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मतं फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केला. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला.
कोण आहेत द्रोपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या नवव्या राज्यपाल होत्या. पाच वर्षांची टर्म पूर्ण करणार्‍या पहिल्या राज्यपाल ठरल्या. झारखंडची स्थापना २000 साली झाली. त्यानंतर २0१५ ते २१ दरम्यान मुर्मू या राज्यपाल होत्या. द्रौपदी मुर्मू या मुळच्या ओडिशा राज्याच्या आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात.
ओडिशात त्या भाजपा – बिजू जनता दल युती सरकारमध्ये मंत्री होत्या. २000 ते २00४ दरम्यान त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. विशेष म्हणजे, द्रौपदी मुर्मू यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र दुखाने भरलेले आहे. मुर्मू यांच्या पतीचे निधन झालेले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे.
१९९७ मध्ये मुर्मू या रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होता. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. २000 मध्ये त्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. ओडिशातील बीजेडी आणि भाजप युती सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रालय सांभाळले. त्यानंतर २000 ते २00४ दरम्यान मत्स्य व्यवसाय आणि प्राणी संसाधन खात्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.