अल्पभूधारक शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा ? अर्ज कुठे करायचा?

391

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात

देशात मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे, असं म्हटलं जातं. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसायांनी सावरल्याचं समोर आलं होते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असतात. त्यावेळी त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र शेतकऱ्यांकडं असणं आवश्यक आहे.

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते.

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता. महाराष्ट्रात 5 एकराच्या आत जमीन ज्या शेतकऱ्याकडं आहे. त्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक दाखला दिला जातो.

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं

पत्ता दर्शवणारा पुरावा

पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं

इतर कागदपत्र

अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमिनीचा सात बारा किंवा 8 अ उतारा उपलब्ध असणं आवश्यक आहे. तलाठ्यांचा अहवाल देखील आवश्यक असतो.

स्वंयघोषणापत्र

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधी मंजूर होईल.

आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?

आपले सरकारवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा. तिथून पुढे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.

वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

15 दिवसांमध्ये अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र

आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आपल्याला अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.