मुल तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी बँकेतून कर्ज घेऊन ऑटो चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र एसटी महामंडळाने महिलांना अर्धी तिकीट तसेच ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास सुरू केल्यामुळे ऑटो चालकांच्या व्यवसायाला कात्री लागली आहे.
आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच बँकेचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न सध्या त्यांना सतावत आहे. मुल तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक युवकांनी ऑटो, काळीपिवळीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक व्यवसाय सुरू केला आहे. मागील काही वर्षांमध्ये बेरोजगारी
मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुल तालुक्यातील तसेच परिसरातील युवक रोजीरोटीसाठी विविध व्यवसायाकडे वळले आहे. दरम्यान, काहींनी प्रवासी वाहतूक करण्याकडे भर दिला आहे. यासाठी बँकेतून कर्ज काढून ऑटो तसेच काळीपिकळी टॅक्सी घेतली आहे.
व्यवसाय सुरळीत सुरू असताना राज्य शासनाने प्रवासी तिकीटमध्ये सूट दिल्यामुळे एसटीचे प्रवासी वाढले. दरम्यान, ऑटो तसेच काळीपिवळी टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे ऑटो चालक, काळी पिवळी टॅक्सी चालक, मालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.