विमा कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी

47
विमा कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी
Ø विभागीय आयुक्तांनी केले विमा कंपनीचे अपील खारीज
Ø पिकाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत अधिसुचना सुनावणी
चंद्रपूर, दि. 25 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान या जोखमेच्या बाबीअंतर्गत झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीने विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाखल केलेले अपिल खारीज करण्यात आले आहे. तसेच विमा कंपनीने शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेश विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले आहे.
जिल्ह्यात सोयाबीन पिकाकरीता 12 तालुक्यातील 35 महसूल मंडळासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी अधिसूचना निर्गमित केली होती. याबाबत दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने 3 ऑक्टोबर रोजी विभागस्तरीय समितीकडे अपील केले होते. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सर्व वस्तुस्थितीचा विचार करता दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी सुनावणी घेऊन बैठकीत उपस्थित शेतकरी प्रतिनिधी, के.व्ही.के. तज्ञ, कंपनी प्रतिनिधी यांचे म्हणणे व कृषी विभागाचे मत विचारात घेतले.
विषयाशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या पडताळणीअंती प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये समावेश असलेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखीमेच्या बाबीअंतर्गत नुकसानीसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेली अधिसूचना ही योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य आहे. त्यामुळे विमा कंपनीने दाखल केलेले अपील खारीज करण्यात येत आहे. यावेळी नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्यासह, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी विनय गौडा, तर नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, विमा कंपनीचे क्षेत्रीय प्रबंधक विनोद इंगळे, विभागीय व्यवस्थापक अभिषेक अत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.विनोद नागदेवते, शेतकरी प्रतिनिधी राजू बुद्धलवार, आदी विभागस्तरीय समिती सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर सुनावणीच्या वेळी दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी विनोद इंगळे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काढलेली अधिसूचना योजनेच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे नाही, तसेच संयुक्त सर्वेक्षणाची माहिती विमा कंपनीला देण्यात आली नसल्याचे सांगितले. विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभिषेक अत्रे यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर पीक नुकसानीचे सर्वेक्षण करतांना सर्वेक्षणाचे वेळापत्रक संयुक्त सर्वेक्षणाकरीता विमा कंपनीला कळविण्यात न आल्याचे सुनावणीदरम्यान सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तालुकास्तरावर सर्वेक्षण करण्याबाबत विमा कंपनीला व तालुका कृषी अधिकारी (सर्व) यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते.
त्याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता जिल्हास्तरावरून वेळेत सूचना दिल्याचे निदर्शनास आले. सर्व तालुक्याचे सर्वेक्षण पूर्ण करून दि. 18 सप्टेंबर 2023 अखेर जिल्हास्तरावर सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाले. जिल्हास्तरावरून जिल्हास्तरीय संयुक्त समितीने सोयाबीन पिकाच्या सर्वेक्षणाअंती झालेल्या नुकसानीबाबतची वस्तुस्थिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निदर्शनास आणून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे कीड व रोगामुळे तालुकास्तरीय समितीचा व जिल्हास्तरीय संयुक्त समितीचा सर्वेक्षण अहवाल बैठकीत समितीसमोर ठेवण्यात आला. या वस्तुस्थितीबाबत सोयाबीन पिकाचे कीड व रोगामुळे 35 महसूल मंडळामध्ये 25 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर प्रादुर्भाव झाल्याने या महसूल मंडळात 50 टक्केपेक्षा जास्त उत्पादनात घट होणार ही बाब मान्य करण्यात आली.
या बैठकीस जिल्हास्तरावरील विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच तालुका व जिल्हास्तरावर सर्वेक्षण करताना विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या संयुक्त सर्वेक्षण अहवालावर स्वाक्षरी आहे. जिल्हास्तरावरील संयुक्त आढावा समिती सभेमध्ये विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावरील संयुक्त आढावा समिती सभेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे कीड व रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत हंगामातील प्रतीकूल परिस्थितीबाबत करण्यात आलेली संपूर्ण कार्यवाही बैठकीत विषद करून कंपनीला काही आक्षेप असल्याबाबत विचारणा केली असता, कंपनीचे कोणतेही आक्षेप नाही असे बैठकीत सांगण्यात आले. याबाबतची नोंद दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये घेण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
सोयाबीन पिकाच्या प्रतिकूल परिस्थितीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. कंपनीचा कोणता प्रतिनिधी कुठे उपस्थित ठेवावा? ही बाब विमा कंपनीशी संबंधित असून यामुळे झालेली कार्यवाही कंपनीचे जबाबदार प्रतिनिधी उपस्थित नाही, हे कंपनीचे म्हणणे योग्य नसल्याचे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी कंपनीच्या प्रतिनिधीस निदर्शनास आणून दिले. तसेच सर्व वस्तुस्थिती विचारात घेऊन आदेश पारित करण्यात आला.