वृध्द साहित्यिक व कलाकारांनी आधार क्रमांक पडताळणी करावी

43

लाभार्थ्यांची माहिती संकलित व अद्ययावत करण्याला प्रारंभ
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते.

आजपर्यंत या योजनेचा अनेक साहित्यिक व कलावंतांनी लाभ घेतला आहे. शासनाकडून मानधनाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती संकलित व अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यातील १७,००० लाभार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी केलेली माहिती संचालनालयाकडे प्राप्त झालेली आहे. प्राप्त झालेले आधार क्रमांक व इतर माहिती योग्य आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी संचालनालयाने याबाबतची ऑनलाइन आधार पडताळणी लिंक तयार केलेली आहे.

ज्या कलाकारांनी आपली आधार नोंदणी केलेली आहे, त्यांनी https/ mahaklasanman.org/ Aadhar Verification.aspx या लिंकवरून आपले आधार क्रमांक व इतर माहिती पडताळणी करणे आवश्यक आहे.

लाभार्थी कलाकार ऑनलाइन माहिती स्वतःच्या मोबाइलवरून किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र व महा इ-सेवा केंद्र येथे जाऊन पडताळणी करू शकतात. तरी लाभार्थ्यांनी या लिंकवर जाऊन तत्काळ आपले आधार कार्ड पडताळणी करून घ्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्या कलावंतांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही, त्यांनी विहित नमुन्यातील माहिती भरून तालुका स्तरावर गट विकास अधिकारी, पंचायत समिती येथे, तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद, समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावे, असे कळविण्यात आले आहे.