डाक विभागाचा वेग परिकथेतील @ गोगलगाईच्या वेगाला ही लाजविणारा!

31

डाक विभागाचा वेग परिकथेतील 🐌 गोगलगाईच्या वेगाला ही लाजविणारा!

चंद्रपूर , प्रतिनिधी.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल च्या वतीने २६जानेवारी २०२४रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एक निवेदन मूल येथे एका कार्यक्रमात देण्यात आले होते, या निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याचे सूचनावजा आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूलच्या मुख्याधिकारी यांना दिनांक २९जानेवारीच्या पत्रकान्वये दिले होते,त्याची प्रतिलिपी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे यांना एका लिफाप्याद्वारे पाठविण्यात आली होती.

आपण असे समजू की या २९जानेवारीच्या पत्रावर ३०जानेवारीला स्वाक्षरी झाली असेल आणि ३१जानेवारीला ते पत्र पोस्टात टाकलं गेलं असेल आणि त्याचा चंद्रपूर ते मूल प्रवास १फेब्रुवारी रोजी सुरू झाला असेल तरीही चंद्रपूर ते मूल हे ४३-४५किलोमिटरचे अंतर पार करून ते मूलला दीपक देशपांडे यांच्या हातात पडायला तब्बल पाच महिने पाच दिवस एवढा अवधी लागला आहे.

विशेष म्हणजे मूल पोस्ट खात्याच्या DELYचा 03-7-24चा शिक्का असतांनाच मूल पोस्ट ऑफिस पासून १००मिटरच्या आत असलेल्या दीपक देशपांडे यांना हे पत्र दिनांक ५जूलै रोजी सायंकाळी ४वाजता मिळाले आहे, यावरुन पोस्ट खात्याच्या वेगवान सेवेचा अंदाज बांधता येऊ शकतो आणि म्हणूनच हा चर्चेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कदाचित लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावर पोहोचायला ही एवढा वेळ लागत नाही ,अशा स्थितीत पोस्ट खात्याच्या ४०-४५किलोमिटरच्या प्रवासाला जर एवढा प्रचंड वेळ लागत असेल तर ही घटना जून्या परिकथेतील गोष्टींची आठवण करून दिल्याशिवाय राहातं नाही.

पोस्ट खात्याच्या या अती दिरंगाईच्या कारभारावर आमचेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे , ठिक आहे ही बाब साधी एका पत्राच्या दखलीची होती , परंतू जर हेच पत्र कुणाच्या नौकरीच्या मुलाखतीचे वा निवडीचे असते , कुणाच्या अती महत्वाच्या कामासाठी आवश्यक कागदपत्रांचे असते तर….?

डाक व पोस्ट खात्याने अशा पद्धतीने होणाऱ्या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्याची आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता या निमित्ताने पुढे आली आहे.

खुद्द पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राला संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एवढा वेळ लागणार असेल तर त्यांनीसुद्धा याबाबत अधिक माहिती प्राप्त करून त्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहेच ,हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने डाक व पोस्ट खात्याच्या अशा दिरंगाईचा तिव्र निषेध करण्यात आला असून याबाबत खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे,व यानंतर कुणाच्याही बाबतीत असा प्रकार घडणार नाही याबाबत आश्वस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.