मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे आता आले शेतकऱ्यांच्या खात्यावर

47

गत हंगामात परिसरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पेरणी होऊनही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शासनाने एक रुपयांमध्ये पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या दोन दिवसांपासून विमा रक्कम जमा होऊ लागली आहे.
ऐन पेरणी हंगामात विमा रक्कम आल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. शासनाने गतवर्षी एक रुपयात विमा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा सर्वत्र प्रचार करून शेतकऱ्यांना विमा घेण्यासाठी प्रवृत्त केले.
सुरुवातीला अनेक अडचणी ऑनलाइन फॉर्म भरताना येत होत्या. मात्र, महा-ई-सेवा केंद्रधारकांनी रात्रीचा दिवस करून अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवला. गतवर्षी मूल भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय अनेक भागात पावसाने ओढ दिली.
त्यामुळे पेरणी होऊनही म्हणावे असे उत्पादन निघाले नाही. काही ठिकाणी पेरण्या होऊनही उगवलेच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पेरणी व मशागतीचा खर्च वाया गेला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा डोळा पीकविम्याकडे लागला होता. पीक विम्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
अखेर दोन दिवसांपासून मूल परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकांच्या प्रतवारीप्रमाणे
पीक विमा रक्कम जमा होऊ लागली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात ही पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर येत असल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.