रक्षाबंधन@बहिण भावाच्या अतुट प्रेमाचा सण

24

राखी पोर्णिमेला रक्षाबंधन असेही म्हणतात. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात. हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या (जर सख्खा भाऊ नसेल तर नात्यातील भावाच्या) हातावर राखी बांधावी. राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करते. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्ष मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन घेणे. स्त्रिया आपला पती, भाऊ यांच्या मनगटावर राखी बांधून आपल्या अब्रूचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या पुरुषावर अथवा भावावर टाकतात.

यावरील कथा पूर्वीच्या काळी दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्रास युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक धागा इंद्राच्या हातावर बांधला. त्या धाग्याच्या (राखीच्या) प्रभावाने इंद्राला युद्धात विजय मिळाला. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.