पी.एम. किसान पोर्टलवर 31 ऑगस्ट पर्यंत मोबाईल क्रमांक अपडेट करावा@चुकीचा मोबाईल क्रमांक असलेल्या शेतक-यांची यादी कृषी सहायकाकडे उपलब्ध   

44

चंद्रपूर, दि.23 : देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिरीक्त लाभ म्हणून  राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ ही योजना सुरू केली असून पी.एम. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे वर्षाला अतिरीक्त 6 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. त्यामूळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार महिन्याच्या अंतराने केंद्र व राज्य सरकारचे मिळून 4 हजार असे वर्षाला एकूण 12 हजार रुपये जमा होत आहे.

पी. एम. किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची पी. एम. किसान पोर्टलवर ई-केवायसी व लँड सिडींग असणे, तसेच बॅंक खात्याला आधार जोडणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सदर बाबी परीपूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महा सन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही.

पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी करतेवेळी जिल्ह्यातील 1624 लाभार्थी शेतकऱ्यांचा चुकीचा किंवा एकच मोबाईल क्रमांक अनेक शेतकऱ्यांच्या नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामूळे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संबंधित कोणतेही एस.एम.एस. प्राप्त होत नाही. अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित गावाचे कृषि सहायक यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर चुकीचा/ डुप्लीकेट मोबाईल क्रमांकाच्या दुरूस्तीसाठी केंद्र शासनातर्फे पी. एम. किसान पोर्टलवर Farmer Corner मध्ये Update Mobile Number ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर सुविधा दिनांक 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत उपलब्ध असल्याने सर्व संबंधित शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून 31 ऑगस्ट 2024 पुर्वी त्यांचे पी. एम. किसान खात्यातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्यावत करून घेण्याचे आवाहन कृषी विभाग तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.