कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंच

30

कृषी महाविद्यालय, मूल आयोजित विसावी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २३ ऑगस्ट, २०२४ रोजी ग्राम दहेगाव ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. विजय गुरनुले, शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “भात पिकांमधील आंतरमशागत, किडी व रोग व्यवस्थापन” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी शेतकऱ्यांना धान उत्पादनातील महत्वाच्या समस्या जाणून त्यावर सखोल माहिती दिली. गाजर गवत हे बारमाही तण असून त्याच्या समूळ निर्मुलणासाठी १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत गाजर गवत सप्ताह आयोजित केला जातो त्या अंतर्गत त्यांचे एकात्मिक पद्धतीने निर्मुलन करण्याविषयी जनजागृती केली. गाजर गवताच्या जैविक नियंत्रणासाठी मेक्सिकन भुंगे (झायगोग्रामा बायकोलोरॅटा) यांचा वापर करावा असे सांगितले. श्री. देवानंद कुसुंबे कृषि विद्या शास्त्रज्ञ यांनी धान लावणीनंतर सुमारे १५ दिवसांनी कोळपणी व निंदनी करून त्यानंतर २-३ आठवड्यांनी पुन्हा एक कोळपणी व निंदनी करून पिक तणविरहित ठेवावे, आंतरमशागत कोनोवीडर किंवा पावर विडरने करावी. तणांच्या नियंत्रणासाठी धान उगवणीपूर्वी व उगवणी पश्चात रासायनिक पद्धतीने तण नियंत्रणाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, तणनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार व वेळेनुसार वापरावे तसेच तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली. धान लावणीनंतर रोपांची मुळे चांगली रुजेपर्यंत बंधित पाण्याची पातळी एक इंच ठेवावी, यांनंतर दाना पक्व होईपर्यंत हि पातळी दोन इंच इतकी वाढवावी. पिक निसवताना पाण्याचा ताण पडल्यास लोंबी पोंग्यान पूर्णपणे बाहेर पडत नाही त्यामुळे उत्पादन घटते अशा वेळी पाणी देणे आवश्यक आहे असे सांगितले. वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. गितांशु डिंकवार यांनी भात पिकावर रोवानिनंतर येणारे करपा, कडाकरपा, आभासमय काजळी, पर्णकोष करपा, पर्णकोष कुजव्या व राईस बंट इत्यादी रोगांबद्दल माहिती दिली. ट्रायकोडर्मा या उपयोगी बुरशीचे रोगांचे नियंत्रणाकरिता वापर करण्यासाठी सांगितले. भात पिकामधील खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी, तुडतुडे या किडीचे होणारे प्रादुर्भाव कमी करण्याकरिता जैविक तसेच रासायनिक पद्धतीचा वापर करताना ते लेबल क्‍लेम किटकनाशके व बुरशीनाशके आहेत कि नाही याची खात्री करून वापर करावा असे सांगितले. सदर कार्यक्रमास एकुण २३ शेतकरी व शास्त्रज्ञ उपस्थित होते. श्री देवानंद कुसुंबे  यांनी सदर कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.