कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एकविसावी बैठक संपन्न.

14

कृषी महाविद्यालय, मूल आयोजित एकविसावी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ रोजी ग्राम *चिमढा* ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे, इतर गावातील प्रगतशील शेतकरी युवराज चौधरी, माजी सरपंच गजानन चौधरी, कृषि साहायक विनोद निमगडे व शेतकरी बांधव तसेच या महाविद्यालयातील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने *“ खरीप पिकांमधील आंतरमशागत, किडी व रोग व्यवस्थापन ”* या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम कृषी महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतकर्यांनी एकत्र येऊन गट शेतीकडे वळावे. विविध पिकनिहाय गट तयार करावे त्यामुळे  शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल. केवळ धान पिकांवर अवलंबून न राहता कडधान्य, तृणधान्य, भाजीपाला व फुलशेती करावी याबाबत माहिती दिली. विशेषतः या चालू खरीप हंगामात आपल्या पिकांचे वारंवार निरीक्षण करत राहावे. शेतात कीड व रोग आढळून आल्यास वेळीस उपाययोजना करून कीड व रोगांपासून पिक वाचवावे. तसेच नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न कसे वाढेल यावर शेतकर्यांनी भर द्यावा. कृषि विद्यापिठाच्या तंत्रज्ञान अवलंब करावा. याकरिता कृषि विद्यापीठाने प्रकाशित केलेली कृषिसंवादिनीचा वापर करावा. यामध्ये विद्यापीठाचे सर्वप्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. सदर कृषिसंवादिनी कृषि महाविद्यालयास विक्रीस उपलब्ध आहे. कृषि महाविद्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेले कृषिनिविष्ठा जसे बि-बियाणे, जिवाणूसंवर्धके, गांडूळखत, जैविकबुरशीनाशके, जैविकविघाटक, इ. जैविकनिविष्ठा विक्रीस उपलब्ध करून देण्यात येईल. *डॉ. अश्विनी गायधनी,* उद्यानविद्या शास्त्रज्ञ यांनी भाजीपाला पिकांसोबत फुलशेती जोडपीक म्हणून कसे महत्वाचे आहे आणि झेंडू एक सापळा पीक म्हणून कीड आकर्षणासाठी कसे उपयुक्त आहे याबाबत मार्गदर्शन केले. याचप्रमाणे  याभागातील शेतकऱ्यांना शेवगा (मुंगन्या) च्या शेंगाची लागवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. *प्रा. मोहिनी पुनसे* कृषिविद्या शास्त्रज्ञ यांनी धान पिक सध्या फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन कसे करावे सोबतच एकात्मिक तण व खत व्यवस्थापन कसे करावे या बद्दल सांगितले. त्याचप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबतसुद्धा माहिती याप्रसंगी दिली. वनस्पतीरोग शास्त्रज्ञ *डॉ. प्रविणा बरडे* यांनी जैविक कीड व्यवस्थापनामध्ये घाटेअळीचा विषाणू एच ए एन पी व्ही व प्रकाश सापळा घरगुती पद्धतीने कसा तयार करावा याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे धान पिकावरील करपा, कडाकरपा, आभासमय काजळी व भाजीपाला पिकावरील रोगांच्या उपाययोजनाबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. *प्रा. देवानंद कुसुंबे* यांनी भात पिकामधील खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी, तुडतुडे व लष्करी अळी या किडींचा प्रादुर्भाव कश्या प्रकारे होतो आणि त्यावर उपाययोजना याबाबत  सविस्तर  मार्गदर्शन  केले .

 

सदर बैठकीस एकुण *२८ शेतकरी* व शास्त्रज्ञ उपस्थित होते. *प्रा. मनीषा लवणकर* यांनी सदर कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.