विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्तीनंतर व्यक्त केला आनंद
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत घोषणेनंतर भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लाडू भरवत ‘देवाभाऊं’चे तोंड गोड केले.
मुंबईतील विधानभवनात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वसंमतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील हा प्रस्ताव सादर केला.
अनेकांचे अनुमोदन
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला बहुतांश आमदारांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गुजरातचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे निरीक्षक विजय रूपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे लाडू भरवत अभिनंदन केले.
नव्याने सत्तेवर येत असलेल्या महायुती सरकारला सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले आहे. विधिमंडळ पक्षाने त्यांची निवड झाल्यानंतर आता सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.
दमदार कामगिरी
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राचा वेगवान विकास होणार आहे. महायुती सरकारच्या काळामध्ये शेतकरी, लाडक्या बहिणी, युवक आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळणार आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदललेला असेल, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीचे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे आहे. त्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगंटीवार यांनी देखील तसाच उल्लेख केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे’ असा आवर्जून उल्लेख सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडताना केला.
सुमारे अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. विकासाचा हा वेग कायम राहणार आहे. महायुती सरकारकडून देण्यात आलेल्या वचनपूर्तीचा हा क्षण असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य स्थापन होत असल्याचा आनंद वाटतो असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.