‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही… पराक्रमावाचून पोवाडा नाही’ अशी म्हण प्रचलित आहे. इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जिद्दीने शक्य करून दाखविणाऱ्याची कामगिरी एखाद्या चमत्कारासारखी असते. असा पराक्रम करणाऱ्याचेच पोवाडे गायले जातात. राज्याचे भाजपाचे हेविवेट नेते धडधडती तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा सुधीर मुनगंटीवारांनी ऐतिसाहिक निर्णयांचा धडाका लावत आपली कारकीर्द गाजवली आहे. या हेविवेट नेत्याने दुर्लक्षित खात्यांना जीवनदान दिले. पहिले ग्राहक संरक्षण आता वन,सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय.
राज्याच्या या नेत्याकडे ‘नाही’ हा शब्द डिक्शनरीत शोधून सापडणार नाही, अशा नेत्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा आवर्जून उल्लेख होतो. नकारघंटा वाजवण्यापेक्षा आपल्याकडे येणाऱ्याला मदत कशी होईल, त्याची समस्या कशी सुटेल याचा प्रामाणिक प्रयत्न मुनगंटीवार करतात. अडिच दशकांपूर्वी राज्यात युतीचे सरकार असताना ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यावेळी ग्राहक संरक्षण व पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी महाराष्ट्राने बघितली आहे. त्यावेळी देखील ग्राहक संरक्षण खाते दुर्लक्षित होते. पण मुनगंटीवार यांनी या खात्याने नवसंजीवनी दिली.
2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ सोबतच वन खात्याची जबाबदारी आली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला 11975 कोटींचं सरप्लस बजेट देणारे ते एकमेव नेते ठरले. ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर’ म्हणून तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या हस्ते मुनगंटीवार यांना गौरविण्यात आले. केवळ ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी घोषणा देऊन मुनगंटीवार थांबले नाहीत. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात 50 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबवली. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुकने त्याची नोंद घेतली. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धन म्हणजे काय, हे प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दाखवून दिले.
2022 मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आले. मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय खाते सोपवण्यात आले. सांस्कृतिक खात्याला फक्त नाट्य स्पर्धा आणि कलावंतांच्या मानधनापुरता महत्त्व होते. फारतर सांस्कृतिक पुरस्कारांमधून होणाऱ्या मनोरंजनाच्या दृष्टीने बघितले जायचे. पण मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक खात्यामध्ये जीव ओतला. त्याला सर्वसमावेशक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त त्यांनी आयोजित केलेल्या उपक्रमांमधून त्याची प्रचिती आली.
खऱ्या अर्थाने सांस्कृतिक ‘कार्य’
याच खात्याच्या माध्यमातून मुनगंटीवार यांनी लंडन येथून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणली. अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सांस्कृतिक ‘कार्य’ करणारा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राला नव्याने ओळख झाली. मत्स्यव्यवसाय खाते तर जवळपास कुणालाही माहिती नव्हते पण मुनगंटीवार यांनी या खात्यातून महाराष्ट्रातील मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांना, मासेमारीवर पोट भरणाऱ्यांना दिलासा दिला. अनेक योजना आणत मत्स्यव्यवसाय बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले.
म्हणूनच शंभर टक्के यश
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या म्हणीची प्रचिती सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कृतीमधून वारंवार दिली आहे. यश आणि अपयशाची चिंता न करता प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असं ते म्हणत असतात. कमालीची सकारात्मकता, तत्परता आणि पाठपुरावा या त्रिसूत्रीवर ते काम करतात. म्हणूनच ते शंभर टक्के यशस्वी देखील होतात.