मुंबई
आधारकार्ड संबंधित काही सेवा या आधार सेवा केंद्रावरच उपलब्ध असतात. उदाहरणार्थ आपला मोबाइक क्रमांक अपडेट करायचा असेल तर आधार सेवा केंद्रात जाण्याशिवाय पर्याय नसतो. याशिवाय, आधारकार्डवरील तुमच्या राहत्या घराचा पत्ता, जन्मतारीख आणि इतर कोणत्याही पद्धतीची माहिती ऑनलाइन पद्धतीने अपडेट करताना अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर नजिकच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन त्या सोडवता येऊ शकतात. अर्थात यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळ आधार सेवा केंद्र कुठं आहे? याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे.
तुमच्या नजिकच्या आधार सेवा केंद्राची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १९४७ यावर कॉल करू शकता. या हेल्पलाइनवर हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमीळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, बंगाली, आसामी आणि उर्दू सहित १२ भाषांमधून तुम्हाला माहिती मिळवता येऊ शकते. UIDAI कडून यासंदर्भात एक ट्विट देखील केलं आहे.
मोबाइल किंवा लँडलाइनवरुन तुम्ही १९४७ या क्रमांकावर संपर्क साधून नजिकच्या आधार सेवा केंद्राची माहिती मिळवता येऊ शकते. यासोबतच mAadhaar App च्या माध्यमातूनही आधार केंद्राची माहिती मिळवू शकता, असं ट्विट UIDAI ने केलं आहे.
mAadhaar App चा वापर कसा करावा?
तुम्ही जर अँड्रॉइज यूझर असाल तर गुगल प्ले स्टोअरमधून mAadhaar App डाऊनलोड करू शकता. तर आयओएस (iOS) वापरकर्त्यांना अॅप स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करता येईल. या अॅपच्या माध्यमातून आधारशी संबंधित सर्व सुविधा आणि माहिती तुम्ही मिळवू शकता. यात नजिकच्या आधार सेवा केंद्राचीही माहिती मिळते.
UIDAI च्या संकेतस्थळाची मदत
आधार कार्ड उपलब्ध करुन देणाऱ्या ‘यूआयडीएआय’ संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊनही आधारकार्ड संबंधित माहिती मिळवता येऊ शकते. यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करावं लागेल. यात My Aadhaar टॅबमध्ये Locate an Enrolment Center या पर्यायावर क्लिक करुन नजिकच्या आधार सेवा केंद्राची माहिती प्राप्त करता येईल.