कृषी योजनांचा लाभ महाडीबीटी पोर्टलवर, 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करा! कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

58

कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळणार आहे. यासाठी शेतकऱयांनी महडीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबरपर्यंत सादर करावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे शेतकऱयांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

शेतकऱयांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱयांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे.

या संकेतस्थळावर अर्ज करा!

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर’शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC)), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱयांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.