पॅनकार्डचा नंबर विशिष्ट पद्धतीने ठरतो, कार्ड नकली का असली तपासण्याचीही आहे खास सोय

60

पॅन कार्ड हा कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी गरजेचा दस्तावेज बनला आहे. पॅनकार्डाचा नंबर हा कसा बनतो हे अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. ही बातमी वाचल्यानंतर तुम्हीही तुमचा पॅनकार्डाचा नंबर नीट तपासून पाहाल याची आम्हाला खात्री आहे. पॅन कार्डाचा नंबर हा एकूण 10 अंक आणि अक्षरे मिळून बनलेला असतो.

तुमचा पॅननंबर नीट पाहिलात तर तुम्हाला कळेल की त्यात पहिली 5 अक्षरे आहेत. पाच पैकी तीन अक्षरे ही काहीही असू शकतात. चौथे अक्षर हे खालील प्रकारात तुम्ही कोणत्या गटात मोडता हे दर्शवणारे असते.

  • A — Association of persons (AOP)
  • B — Body of individuals (BOI)
  • C — Company
  • F — Firm
  • G — Government
  • H — HUF (Hindu undivided family)
  • L — Local authority
  • J — Artificial juridical person
  • P — Individual or Person
  • T — Trust (AOP)

उदा. तुमचे वैयक्तिक वापरासाठीचे पॅनकार्ड असेल तर त्यात चौथे अक्षर P असेल. कंपनीचे पॅनकार्ड असेल तर चौथे अक्षर C असेल. पॅनकार्डच्या नंबरमधील पाचवे अक्षर हे आडनावातील पहिले अक्षर असते. पाच अक्षरे झाल्यानंतर पुढे 4 अंक असतात. हे अंक काहीही असू शकतात. शेवटचे म्हणजेच दहावे अक्षर हे आधीची 9 अक्षरे आणि अंक यांचे कॉम्बिनेशन पाहून ठरवण्यात आलेले असते.

तुमचे पॅन कार्ड नकली तर नाही ना? जाणून घ्यायचे असल्यास ‘असे’ तपासा

कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड हे खूप महत्वाचे दस्तावेज आहे. बँक खाती उघडण्यापासून मालमत्ता खरेदी-विक्री, वाहने खरेदी-विक्री, आयकर विवरणपत्र भरणे यापासून इतर अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये याचा उपयोग होतो. दोन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने खरेदी करताना पॅनकार्डची प्रत देणे बंधनकारक आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी नकली पॅन कार्ड बनवण्याचे प्रकरण समोर येताना दिसत आहेत. अशातच आपले पॅन कार्ड नकली तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तथापि असे काही सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे आपले पॅन कार्ड प्रमाणित आहे की नकली, हे आपण जाणून घेऊ शकता.

आयकर विभागाकडून दिले जाते पॅन कार्ड

पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे पॅनकार्ड. हिंदुस्थानी आयकर विभागाकडून पॅन कार्ड दिले जाते. विविध आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डची गरज लागते. व्यक्ती आणि कंपनीच्या नावाने पॅन कार्ड जारी केले जाते. आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे.

असे ओळखावे प्रमाणित पॅन कार्ड

  • आयकर विभागाने संचालित अधिकृत ई-फाईलिंग पोर्टलला भेट द्या
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘आपले पॅन तपशील सत्यापित करा’ असा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा
  • यानंतर, वापरकर्त्यांना पॅनकार्डशी संबंधित आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • यात पॅन नंबर, पॅनकार्ड धारकाचे नाव, जन्मतारीख अशी माहिती द्यावी लागेल.
  • माहिती जुळल्यास आपले पॅन कार्ड प्रमाणित आहे, अन्यथा ते नकली आहे हे तुम्हाला समजेल.

अशा प्रकारे बनवा पॅन कार्ड

जर आपल्याकडे पॅन कार्ड नसेल, तर तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीचा वापर करून पॅन कार्ड बनवू शकता. प्रथम आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा. ई-पॅनसाठी आपला आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर ओटीपी जनरेट होईल आणि काही मिनिटांत आपल्याला ई-पॅन जारी केले जाईल.